४२ विनानंबर प्लेट गाड्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शहर व तालुका हद्दीतील अनेक दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडलेल्या असून या चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेत ४२ विनानंबरप्लेट असलेल्या गाड्या पोलिसांना आढळून आल्या असून त्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी विनानंबरप्लेट गाडी ग्राहकांना दिल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या चोरांकडून अत्यंत कमी किमतीत विकत घेऊन त्या गाड्या विनानंबरप्लेट वापरल्या जातात, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने काल (दि. २६) विनानंबरप्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यात ४२ दुचाकी वाहने विनानंबरप्लेटची आढळून आली. सदर वाहनांवर १८ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ४२ वाहनांपैकी एक वाहन हे व्हेईकल डीलर यांनी आरटीओ नोंदणी होण्यापूर्वीच विनानंबर प्लेट ग्राहकास दिल्याने त्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
काल दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या कारवाईतील ४२ वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून ही वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. आपल्या दुचाकी, चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबरप्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवल्यास चोरीचे वाहन शोधून काढणे ही सोपे होईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
नवीन वाहनांवर नंबरप्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदरील वाहने नंबरप्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूमवाल्यांना आरटीओद्वारे पत्र पाठवून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे. ही शोध मोहीम पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवालदार ठोंबरे, संदिप ठाणगे, जालिंदर धायगुडे आदि पोलिस पथकाने केली.
