Type Here to Get Search Results !

पारनेर - टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयात बीबीसी मराठी संपादकांसोबत विद्यार्थ्यांनी साधला संवाद

 



विद्यार्थ्यांचा  आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी नवोदय विद्यालयाचा अनोखा उपक्रम !


टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयात बीबीसी मराठी संपादकांसोबत विद्यार्थ्यांनी साधला संवाद !


पारनेर - प्रतिनिधी 


           नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक संपादकांशी संवाद या विषयांतर्गत आज 27 डिसेंबर 2024 रोजी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे बीबीसी मराठीचे संपादक श्री. अभिजीत कांबळे सर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली. विशेष बाब म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले, केसरी, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, झी 24 तास, ई टीव्ही अशा अनेक  माध्यमांतून पत्रकारिता केलेले कांबळे सर हे नवोदय विद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.

            विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना श्री कांबळे सरांनी सांगितले की नवोदय विद्यालयात शिकलेला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. मीसुद्धा पत्रकारिता या क्षेत्रात यशस्वी संपादक होण्यामागे विद्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 

आपल्या चौफेर वाचनामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवता येते. संभाषण कौशल्य विकसित होते, लेखन कौशल्य सुधारते.नवोदय विद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.

         विविध प्रकारच्या माध्यमांमध्ये किंवा पत्रकारितेत खूप ताकद असते त्याचा आपण समाजासाठी विधायक उपयोग करायला हवा. देशाचे नागरिक म्हणून आपण स्वायत्त संस्था, विधायिका, न्यायपालिका या सर्वांची कार्य काय हे आपण समजून घेतले पाहिजे. समाज हिताचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला हवेत आणि ते आदरपूर्वक शिक्षकांना विचारायला हवेत. 

 बीबीसीच्या कामाचं स्वरूप सांगताना ते म्हणाले की फोटो, व्हिडिओ, शब्दांकन, बातमीची प्रामाणिकता तपासूनच निवड करुन बातम्या प्रसारित केल्या जातात. लोकांच्या जगण्याशी संबंधित विषय लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, यासाठी बातम्या मनोरंजक कशा करता येतील यासाठी बीबीसी प्रयत्नरत आहे. पत्रकारिता या क्षेत्रात अनेक आव्हानात्मक प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. 

            कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथी श्री.अभिजीत कांबळे सर व सौ.अर्चना कांबळे मॅडम,श्री.कपिल ठोकळ सर,श्री.अनिल मोरे सर या सर्वांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे सर व उपप्राचार्य श्री मुन्नरवार सर यांनी केले.संपादकांची मुलाखत विद्यालयाचे मराठी विषयशिक्षक श्री. राजाराम फंड सर, ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. मदन तुपकर सर,श्री भोंडवे सर,या शिक्षकांनी तसेच वैभवी बोढके, निर्झरा वाघमोडे, अविष्कार हांडे,सर्वज्ञ वनपुरे,श्रेयस पंचमुख, श्रुतिका झगडे,संचेती जगताप या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून संवाद साधत मुलाखत घेण्यात आली.