विद्यापीठाच्या बांधकाम विभागातून माहिती देण्यास टाळाटाळ.
अभियंता ढोके यांची एसआयटी चौकशी लावली जाणार का? कि त्यांना पाठीशी घालणार?
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
माहिती अधिकार अंतर्गत पत्र देऊनही माहिती देण्यास राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागामध्ये टाळाटाळ केली जात आहे. जन माहिती अधिकारी कर्मचार्यांची अपुरी संख्या तसेच कामकाजाचा व्याप अशी कारणे दाखवून दाखवून माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने बांधकाम विभागातील कामकाजाची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरणार्या बांधकाम विभागातील अभियंता मिलींद ढोके यांच्या बाबत वाढलेल्या तक्रारी पाहता प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बांधकाम विभागातील अभियंता तसेच कंत्राटी अभियंत्यांकडून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय करीत ऑनलाईन निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी कामाचे तुकडे पाडले जातात.
तसेच संबंधित कामामध्ये जो कोणी मर्जी सांभाळेल त्याला कागदोपत्राची तसेच अधिकृत परवाने नसतानाही बिनदिक्कतपणे कामे वाटपाचा निर्णय बांधकाम विभागातून होत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. विद्यापीठात मा. आ. प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये अधिकृत परवाने नसताना तसेच शासकीय दस्ताऐवज नसतानाही निविदेची खिरापत वाटप झाल्याचे उघड झाले होते.
त्यानंतरही कामकाजात पुन्हा तोच सुत्र वापरत मर्जीतल्या ठेकेदारांवरच कृपा राखण्याचे काम विद्यापीठ अभियंता कार्यालयातून होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे माहिती अधिकारातून माहिती मिळविण्यासाठी अर्ज केले असता कामाचा अधिक व्याप, कर्मचार्यांची अपुर्तता, माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अधिक वेळ असे वेगवेगळे कारणे देत माहिती दिली जात नसल्याचे पत्र हाती दिले जात आहे. विद्यापीठ प्रशासनाचे जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक नियंत्रक यांच्या सहीने वेळोवेळी माहिती देणे शक्य नसल्याचे पत्र दिले जात असल्याने कामकाजाबाबत शंका वाढत चालली आहे.
दरम्यान विद्यापीठ बांधकाम विभागाच्या कामकाजाची सविस्तर चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांचा भोंगळ कारभार उघडकीस येण्याची शक्यता आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवत मर्जी सांभाळणार्या ठेकेदारांना पोसणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक तनपुरे व बाळासाहेब जाधव यांनी राज्य शासनाकडे केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेने विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके यांच्या कामकाजा बाबत एसआयटी चौकशी लावण्या बाबत अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. कृषी विभागाकडून अभियंता ढोके यांची एसआयटी चौकशी लावली जाणार का? कि त्यांना पाठीशी घालणार, ही चर्चा तालुक्यात सुरु आहे.
