Type Here to Get Search Results !

पारनेर - दर्जेदार शिक्षणामुळेच ढवळपुरी आश्रमशाळेचे नावलौकीक - डॉ. बापूसाहेब कांडेकर



 दर्जेदार शिक्षणामुळेच ढवळपुरी आश्रमशाळेचे नावलौकीक - डॉ. बापूसाहेब कांडेकर

ढवळपुरी आश्रमशाळेच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगिण व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने आश्रमशाळेचे संस्थापक स्वर्गिय डॉ सईद काझी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत असे प्रतिपादन एशियन नोबल हॉस्पिटलचे डॉ. बापुसाहेब कांडेकर यांनी ढवळपुरी येथे डॉ सईद काझी यांच्या जयंतीनिमित्त केले. यावेळी डॉ अविनाश मोरे, डॉ. भरत साळवे, डॉ. एस एम इक्बाल, डॉ सईद शेख, ढवळपुरीचे उपसरपंच बबनराव पवार, संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, प्राचार्य बापूसाहेब रुपनर, मुख्याध्यापक संदीप महांडुळे, प्राचार्या शिरीन पठाण, मुख्याध्यापक समीउल्ला शेख, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे, रमेश केदारी, संभाजी ढेकळे, संदीप थोरात, कविवर्य रामदास भालेराव, पोपटराव महांडुळे, प्रगतशील शेतकरी गंगाराम खरमाळे, मिलिंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

      स्व डॉ सईद काझी यांच्या जयंतीनिमित्त धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुल्या व्यायामशाळेचे डॉ कांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ कांडेकर म्हणाले की, शहराच्या मानाने ग्रामीण  भागात शिक्षणाच्या बाबतीत  सुविधांचा अभाव असतो. परंतु डॉ. काझी यांनी २६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आश्रमशाळेत आज १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी वैद्यकीय, इंजिनियरिंग व इतर उच्च शिक्षण पूर्ण करून विविध उच्च पदावर काम करत आहेत, हीच डॉ. सईद काझी यांची दूरदृष्टी होती. त्यांनी भाळवणी, ढवळपुरी परिसरात वैद्यकीय व्यवसाय बरोबरच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही चांगले कार्य केले. त्यामुळेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम केले जात आहे. 

डॉ अविनाश मोरे म्हणाले की, शालेय जीवनापासूनच डॉ. काझी हे विविध चळवळींमध्ये सहभागी असायचे. कॉलेज जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. म्हणून ढवळपुरी सारख्या दुर्गम व आदिवासी भागात त्यांनी वैद्यकीय व्यवसायाप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केलेले आपण पाहत आहोत. भविष्यातही त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच त्यांच्या वारसांनी कार्य करावे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही डॉ. मोरे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बोलताना उपसरपंच बबनराव पवार म्हणाले की, चाळीस वर्षांपूर्वी डॉ. काझी यांनी ढवळपुरी सारख्या दुर्गम व आदिवासी भागातील वाड्या, वस्ती, तांडे या ठिकाणी मोटरसायकलवर फिरून रुग्ण सेवा केली होती. त्यामुळे या भागाशी त्यांची नाळ जोडलेली होती आणि म्हणूनच आश्रमशाळेच्या रूपाने मोठे कार्य त्यांनी या ठिकाणी केलेले पाहायला मिळते.

याप्रसंगी डॉ. काझी यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आदींमधील विजय विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लतीफ राजे यांनी केले तर प्रस्ताविक सचिव रेहान काझी यांनी केले. तर आभार प्राचार्य बापूसाहेब रुपनर यांनी मानले.


चौकट -

रक्तदान शिबीराचे आयोजन 


स्वर्गीय डॉ. काझी यांना सामाजिक व वैद्यकीय सेवांमध्ये विशेष आवड असल्यामुळे ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या विद्यमाने डॉ सईद काझी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी असे जवळपास ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अशी माहिती सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. जमील शेख यांनी दिली