एक वर्षाने लागला अपहरित अल्पवयीन मुलीचा शोध.
अल्पवयीन असतानाच केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे पिडीता गर्भवती.
वर्षभरात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सुटका केलेल्या अल्पवयीनाची संख्या ५४.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दि. १७ जानेवारी २०२४ रोजी राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका अज्ञात आरोपीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३६६ प्रमाणे अपहरणचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील पीडिता तसेच आरोपी हे दि. ९ जानेवारी २०२५ रोजी राहुरी तालुक्यात आल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाकडून त्यांचा शोध घेण्यात आला. यातील पीडीतीची सुटका करण्यात आली. सदर पीडित अल्पवयीन असतानाच तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती गरोदर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिला वैद्यकीय चाचणीसाठी अहिल्यानगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
सदर गुन्ह्यांमध्ये पॉस्को कायद्यान्वये तसेच भारतीय न्याय संहिता अन्वये कलम वाढ करून गुन्ह्यातील आरोपी नामे भारत ऊर्फ विकास कडूबा जाधव, वय २९ वर्षे, रा. टाकळीमियाॅ, ता. राहुरी, यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील व लेखनिक गणेश लिपणे हे करत आहे.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन २०१६ मध्ये अपहरन झालेली एक मुलगी, सन २०२१ मध्ये अपहरण झालेल्या २ मुली, सन २०२२ मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन २०२३ मध्ये अपहरण झालेल्या ५ अल्पवयीन मुली तसेच सन २०२४ मध्ये अपहरण झालेले एकूण ४१ मुली, व ५ मुले असे एकूण ५४ अपहरित बालकांचा (४९ मुली व ५ मुले) जानेवारी २०२४ पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या ४० आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवालदार राहुल यादव, पोहेकॉ. अशोक शिंदे, पोकॉ. अजिनाथ पाखरे, लेखनिक गणेश लीपने, पोलीस हवालदार गणेश सानप, महिला पोलीस हवालदार राधिका कोहकडे, स्वाती कोळेकर , वृषाली कुसळकर, चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद तसेच पो. ना. सचिन धनाड, पो. ना. संतोष दरेकर यांच्या पथकाने केली.