जिल्हास्तरीय महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ संपन्न.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय महिला मेळावा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षा निमित्त राष्ट्रसेविका समिती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने राहुरीत जिल्हास्तरीय महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ शनिवारी दि. १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
राहुरी येथील स्टेशन रोडवरील पांडुरंग लॉन्स येथे शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी या मेळाव्याचा शुभारंभ ध्वजारोहणाने झाला. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या पालखीतून कार्यक्रम स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रसेविका समितीच्या नाशिक विभागाच्या कार्यवाहीका शुभांगी कुलकर्णी यांनी सध्या सर्वत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षा निमित्त वर्षभर समितीच्या वतीने होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
यावेळी राहुरीच्या नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीच्या उत्तर नगर जिल्हा कार्यवाहीका निता राशिनकर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रमुख पाहुण्या आशा धरम आणि मेघना खेडकर होत्या. राहुरी, नगर शहर, नगर ग्रामीण, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आदी ठिकाणाहून सेविका व अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या सदस्या उपस्थित होत्या.
राष्ट्र सेविका समितीच्या विविध शाखेच्या सेविकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर नाटिका, गीत, प्रबोधन पर असे विविध प्रसंग यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला कुलकर्णी यांनी केले. तसेच आभार व समारोप उत्तर नगर जिल्हा संपर्क प्रमुख सारिका ढोकणे यांनी केले. राहुरी येथील अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच राष्ट्रसेविका समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.