इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे 'कॅन बायोसिस'चा दिल्लीत गौरव
पुणे, इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे कॅन बायोसिस या जैविक खतांच्या उत्पादनात देशविदेशात नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीला ज्युरी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथील फ्रेंच दूतावासात नुकताच इंडो फ्रेंच बिझनेस ॲवार्ड्स २०२५ पुरस्कार सोहळा झाला. कॅन बायोसिसच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी फ्रान्सचे भारतातील राजदूत थिअरी मॅथ्यू यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.
इंडो फ्रेंच बिझनेस ॲवार्ड्स पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष होते. जैविक कृषी उत्पादन क्षेत्रातील देशातील पहिल्याच बहुराष्ट्रीय कंपनीला पुरस्कार मिळवण्याचा मान कॅन बायोसिसला प्राप्त झाला. कल्पक, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विषमुक्त शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक दर्जेदार जैविक उत्पादनांची निर्मिती यासाठी कॅन बायोसिसची निवड करण्यात आली. आयटी, संरक्षण, बँकींग, सेवा, उत्पादन, सौर उर्जा आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांना यावेळी गौरविण्यात आले.
इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारल्यानंतर संदीपा कानिटकर यांनी सांगितले, "संशोधन आणि दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उत्पादनात कॅन बायोसिस ही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे कार्य करीत आहे. त्यामुळेच विषमुक्त आणि भरघोस शेतमाल पिकवण्यासाठी देशविदेशातील लाखो शेतकरी मोठ्या विश्वासाने कॅन बायोसिसच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निवड करतात. याची दखल 'इंडो फ्रेंच चेंबर'ने घेतल्याचा आनंद आहे." हवामान बदलांमुळे शेतीवरची संकटे वाढली आहेत. रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता ढासळते आहे. अशा स्थितीत जमिनीची गुणवत्ता सुधारून शाश्वत शेती उत्पादन वाढीचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी कॅन बायोसिसची जैविक खते-औषधे लाखो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहेत. कॅन बायोसिसने नुकताच डी सँगोज या फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीसोबत धोरणात्मक भागिदारी केली. डी सँगोजच्या कृषी निविष्ठा जगातील अठ्ठावीस देशांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत.
'इंडो फ्रेंच चेंबर'च्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील तंत्रज्ञान देवाणघेवाण, व्यवसाय विस्तार, भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन दिले जाते. भारत आणि फ्रान्स यांच्या समन्वयाने कार्यरत असणाऱ्या जगभरातील साडेसातशेपेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधीत्व ही संस्था करते. येणारे वर्ष २०२६ हे भारत व फ्रान्स यांच्यासाठी 'इनोव्हेशन इयर' असणार आहे. या उपक्रमाची मुहूर्तमेढ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नुकतीच रोवली. त्या दृष्टीने 'इंडो फ्रेंच चेंबर' कार्यरत आहे. शेतीआधारीत स्टार्ट-अप, शाश्वत शेती उत्पादन, अन्नसुरक्षा, आरोग्य, अवकाश संशोधन या विषयांना प्राधान्य देण्याची दोन्ही देशांची भूमिका असणार आहे.
