Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर : काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात

 काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात

 


सर्वतोपरी मदतीची ग्वाही 


अहिल्यानगर : प्रतिनिधी 

    काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना परतण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी दिली. 

      नगरसेवक योगीराज गाडे यांच्यामार्फत या पर्यटकांनी खा. लंके यांच्याशी संपर्क केला. खा. लंके यांनी सर्व पर्यटकांची आस्थेने चौकशी करून आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांना ठार मारल्यानंतर तेथील परिस्थिती तणावपुर्ण असून तिथे पर्यटनासाठी गेलेले देशाच्या विविध भागांतील पर्यटक भितीच्या छायेखाली आहेत. या हल्ल्यानंतर काश्मीर ते जम्मू हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो पुर्ववत सुरू करण्यात आला असून खा. लंके व पर्यटकांचा संवाद झाल्यानंतर या पर्यटकांनी खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे जम्मू येथे यावे. जम्मूतून या पर्यटकांना रेल्वेची तिकीटे तातडीने मिळवून देण्यासाठी आपले कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही खा. लंके यांनी दिली. या पर्यटकांच्या परतीच्या तिकीटासाठी आपले पत्रही रेल्वे प्रशासनास देण्यात येईल असेही खा. लंके यांनी प्रवाशांना सांगितले. 

      या प्रवाशांना विमानाने परतण्यासंदर्भातही खा. लंके यांनी संबंधितांशी चर्चा केली. मात्र अतिरेकी हल्ल्यात ठार झालेले पर्यटक व त्यांचे नातेवाईक यांना हवाई प्रवासात प्राधान्य देण्यात येत असल्याने हवाई मार्गाने परतण्यासाठी सध्या तरी अडचणी येत आहेत. त्यामुळे या पर्यटकांनी जम्मूवरून रेल्वेमार्गाने अहिल्यानगरकडे यावे असे खा. लंके यांनी सुचित केले. दरम्यान, नगरपर्यंत पोहचेपर्यंत काही अडचणी आल्यास संपर्कात राहण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले.