जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी घेतले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार विनोद गायकवाड यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांनी यावेळी त्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.विनोद गायकवाड यांच्या निवडीचे पत्रकारितेच्या क्षेत्रातून आणि सामाजिक वर्तुळातून स्वागत होत आहे. निवडीनंतर त्यांनी प्रथम अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गैरप्रकार उजेडात आणण्याचे आणि सत्य व निष्पक्ष पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी गायकवाड यांना समाजसेवा आणि पत्रकारिता यांचा समन्वय साधून सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देण्याचा सल्ला दिला. या मार्गदर्शनाने गायकवाड यांना नव्या जबाबदारीसाठी प्रेरणा मिळाली.या भेटीवेळी गायकवाड यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपतालुका अध्यक्ष श्रीनिवास शिंदे आणि दैनिक नगर सह्याद्रीचे पारनेर तालुका प्रतिनिधी गणेश जगदाळे, युवहान गायकवाड उपस्थित होते. या सर्वांनी अण्णा हजारे यांच्याशी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर सविस्तर चर्चा केली. अण्णांनी सर्वांना ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.विनोद गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. स्थानिक पातळीवरील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली आहे. त्यांच्या निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांनी या माध्यमातही आपले योगदान दिले आहे. आता जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.






