Type Here to Get Search Results !

मंचर - खरबुजाला बाजार भाव नसल्याने शेतकरी चिंतेत



 


खरबुजाला बाजार भाव नसल्याने शेतकरी चिंतेत 


मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक वाढली आहे, परंतु या वाढत्या आवकेमुळे खरबुजाच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव मंगळवारी, १४ एप्रिल २०२५ रोजी १० ते १२ रुपये किलोपर्यंत खाली आला.


यामुळे शेतकऱ्यांना खरबूज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणे अवघड झाले आहे. उन्हाळ्यात थंडावा देणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबुजाची लागवड फेब्रुवारीत झाली होती आणि एप्रिल च्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू झाली असून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, चांडोली, निरगुडसर, पारगाव, काढापुर, लाखणगाव भागातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी मंचर बाजार समितीत आणत आहेत.उन्हाळ्यामध्ये खरबुजाला मागणी वाढून जास्त बाजार भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती, परंतु मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. बाजारात कुंदन खरबुजाला विशेष मागणी असली, तरी रॉयल आणि विजय या जातींचे खरबूजही विक्रीसाठी दाखल होत आहेत. मागील आठवड्यात चांगल्या प्रतीच्या खरबुजाला ३० रुपये किलोचा भाव मिळाला होता, पण आता १० ते १२ रुपये किलोवर लिलाव होत आहेत. 


▪खरबूज लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते आणि ९,००० रोपांची लागवड होते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे खरबुजाला किमान ४० ते ५० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे, परंतु सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणारा आहे.


▪ओंकार भरत फल्ले ( खरबूज उत्पादक शेतकरी मेंगडेवाडी)


▪मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरबुजाची आवक वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. ऐन उन्हाळ्यात खरबुजाचा उठाव कमी झाला असून मागणीपेक्षा उत्पादन जास्त असल्याने भाव १० ते १२ रुपये किलोवर स्थिरावले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, खर्च वसुलीची चिंता वाढली आहे.


▪धनेश निघोट ( खरबूज व्यापारी मंचर बाजार समिती )


खरबुजाचा हंगाम साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होतो. तो जुनपर्यंत चालतो.  या काळात थंडी असल्याने मागणी देखील कमी असते. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वातावरणातील तापमान वाढू लागल्यानंतर मग मात्र मागणी आणि आवकही वाढू लागते. या दरम्यान खरबुजाचे प्रति किलो सरासरी दर थोडेसे कमी असतात परंतु उन्हाळ्यात ते २० ते २५ रुपयां दरम्यान पोहचतील अशी शक्यता वाटत आहे.


निलेश थोरात, (मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती)