पारगाव येथे पुलांचे कठडे, पाईप चोरीला
पारगाव (ता. आंबेगाव) परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून मळ्यांमध्ये, वाडी- वस्त्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच छोट्या पुलांचे संरक्षक कठडे चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत.
पारगाव परिसरात घोड, मीना नदीच्या पात्रांवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांना संरक्षण कठडे म्हणून लोखंडी पाईप लावण्यात आले आहेत. अनेक बंधारे हे निर्जनस्थळी असल्याने त्याचा भुरट्या चोरट्यांनी फायदा घेतला आहे. गुरुवारी (दि.१७) चोरट्यांनी वाडा वस्ती येथे लोखंडे माळी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर छोट्या पुलाचे संरक्षण कठडे व कठड्यांचे लोखंडी पाईप पळवून नेले आहेत. माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व बजरंग देवडे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिली असुन पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अजित मडके, दिव्या नवले यांनी शुक्रवारी (दि. १८) सकाळी घटनास्थळांची पाहणी केली. यापूर्वीही पारगाव परिसरातील खारओढा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापेदेखील चोरट्यांनी लंपास केले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे वीजपंप, केबलदेखील चोरट्यांनी पळविल्या. आता छोट्या पुलांचे तसेच बंधाऱ्यांच्या संरक्षक कठड्याचे लोखंडी पाईप चोरटे पळवत आहेत. पारगाव पोलिसांनी या भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.
फोटो - पारगाव ता. आंबेगाव येथे चोरीला गेलेल्या लोखंडी पाईपची पाहणी करताना पारगाव पोलीस ठाण्याची अधिकारी व ग्रामस्थ

