भामट्यांनी अपंग व्यक्तीचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावुन नेली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील बस स्थानक समोर मोटारसायकल आलेल्या तीन भामट्यांनी निलेश धिवर या अपंग व्यक्तीचा मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावुन नेली. ही घटना दि. २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
निलेश रघुनाथ धिवर, वय ४३ वर्षे, रा. शनिमंदिर रोड, खंडोबा चौक, ता. राहाता, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निलेश धिवर हे दि. २१ एप्रिल २०२५ रोजी कामा निमित्त राहुरी येथे आले होते. त्यांचे काम झाल्यानंतर ते रात्री ११ वाजता राहता येथे जाण्यासाठी राहुरी बस स्थानक समोर गाडीचे वाट पहात होते.
तेथे एक अनोळखी इसम धिवर यांच्या जवळ गेला त्याने फोन लावण्यासाठी मोबाईल मागितला. तेव्हा धिवर यांनी माझेकडे बॅलन्स नाही, असे त्याला सांगितले. त्यावेळी तेथे मोटारसायकलवर आणखी दोन अनोळखी इसम आले. ते म्हणाले कि, तुझे काय नाटक चालू आहे. असे बोलून त्यांनी धिवर यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला त्या मोबाईलच्या पाठीमागे कव्हरमध्ये त्यांचे आधारकार्ड व हँडिकॅप कार्ड होते तसेच १ हजार ४५० रूपये रोख रक्कम होती.
या घटने बाबत निलेश रघुनाथ धिवर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. ४७३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
