Type Here to Get Search Results !

राहूरी - पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या न्यायदानाचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा- मा. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

 



पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या न्यायदानाचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा- मा. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.


राहूरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने त्रिशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत कवी महिपती देवस्थानचे मठाधिपती ह. भ. प. अर्जुन महाराज तनपुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सदस्य आ.सत्यजित तांबे हे होते.


पंढरपूर येथील उपोषण करते माऊली हळणवर व  दीपक बोराडे, योगेश धरम हे होते. सभापती राम शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ बाचकर व डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संचालक अशोकराव तमनर, मार्केट कमिटीचे संचालक रामदास बाचकर, माजी संचालक कचरू चितळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या न्यायनिष्ठ राजकारभाराचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी धर्मशाळा, काशी विश्वेश्वरासह १२ ज्योतिर्लिंगांचे उद्धार केले. स्वतःच्या मुलाने चूक केली असता त्याला शिक्षा देण्याचे फर्मान सोडले आणि राज्यातील चोर-लुटारूंना आवर घालणाऱ्या यशवंत फणसेशी आपल्या मुलीचा विवाह लावला. हा आदर्श आजही प्रेरणादायी आहे.”


आ. सत्यजीत तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अहिल्यादेवीं प्रती माझी निष्ठा आहे. माझ्या शेतात अहिल्यादेवींची बारव आहे व माझ्या कन्येचे नावही अहिल्या आहे. प्रतिष्ठानला त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.” त्यांनी मांजरी येथील स्मारक बांधणारे सिताराम विटनोर यांचा उल्लेख करत त्यांच्या समर्पित कार्याची प्रशंसा केली.


कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिला प्रशासक डॉ. सौ. उषाताई तनपुरे, पत्रकार गोरक्षनाथ शेजुळ, शैक्षणिक क्षेत्रातील दत्तात्रय वाणी, शेतकरी नेते रवीभाऊ मोरे, सामाजिक कार्यकर्ता गणेशदादा हारदे, वैद्यकीय सेवा देणारे डॉ. तन्वीर देशमुख, कराटे प्रशिक्षक नारायण माळी आदींना गौरविण्यात आले. 


प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि अहिल्यादेवींंचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे. विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, हीच खरी अहिल्यादेवींना मानवंदना आहे.”


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलनर व आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर बाचकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप ह. भ. प. अर्जुन महाराज तनपुरे व पोपटराव शेंडगे दांपत्य यांच्या हस्ते आरती करून महाप्रसादाने झाला.