मंचर गावचे ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिराचे काम लवकर पूर्ण करावे महिलांची मागणी
मंचर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्तादेवी मंदिराचे काम करून मंदिराचा जिर्णोद्धार लवकर करावा अशी मागणी मंचर येथील महिलांनी केली आहे. याबाबतचे पत्र महिलांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना दिले आहे. नगरपंचायत प्रशासनाने भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री मुक्ता देवी मंदिराचे काम पूर्ण न केल्यास सामूहिक पणे उपोषण करू असा इशारा महिलांनी दिला आहे.
मंचर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्तादेवी मातेचे मंदिर जीर्ण झाले असल्याने ते नगरपंचायत च्या माध्यमातून पाडण्यात आले होते. मोडकळीस आलेले मंदिर पाडल्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. मंदिर पाडल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने आजूबाजूच्या परिसरात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुक्तादेवी मंदिर हे मंचर गावचे ग्रामदैवत असून या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या मंदिराचे लवकरात लवकर काम होऊन त्याच्या जिर्णोद्धाराचे काम व्हावे अशी मागणी महिलांनी पत्राद्वारे केली आहे.