कु. अनुजा ज्ञानदेव पवार हिची लेखापाल पदी निवड.
काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करणे अशक्य नाही- अनुजा पवार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरीत तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रहिवासी कु. अनुजा ज्ञानदेव पवार हिची कोकण लेखा कोषागार विभागात क. लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे व अधिकारी झाल्याने सगळीकडे त्या सत्काराच्या मानकरी होत आहेत.
अनुजा हिने कठीण परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जिवावर स्पर्धा परीक्षेच्या रणांगणावर आपला पहिला विजय मिळवला आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण राहुरी येथेच झाले त्यानंतर मोठी दीदी आयटीमध्ये जॉईन झाल्याने अनुजाने राहुरी कॉलेजमध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स चे शिक्षण घेतले.
२०२१ मध्ये पदवी पूर्ण झाल्यावर जिद्दीने एम पी एस सी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला पण कोरोना सारखी परिस्थिती असल्याने आणि पुण्यासारख्या ठिकाणी एम पी एस सी अभ्यासाला जाणे शक्य नसल्याने त्यांनी पहिले ३ वर्ष घरीच तयारी केली पण यश तिला थोडक्यात हुलकावणी देत होते.
या अपयशाच्या काळात तिची आई चंद्रकला पवार आणि दीदी तिच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या तसेच वडील, भाऊ अजित आणि दाजी सचिन शेलार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मग तिने २०२४ मध्ये राहुरीत बिलीव स्टडी हब अभ्यासिका जॉईन करून जोमाने अभ्यास सुरू केला आणि या यशाला गवसणी घातली.
सध्या अनुजा पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा देऊन सहारा अकॅडमी राहुरी फॅक्टरी येथे पोलीस उप निरीक्षक पदाच्या मैदानी चाचणीची तयारी करत आहे. तसेच आयसीडीसी मुख्यसेविका, सहकार अधिकारी नाशिक, आदिवासी विकास विभाग या पदांसाठी प्रतीक्षा यादी मध्ये आहे. घरची परिस्थिती बेताचीच आई-वडील शिवण काम करायचे त्यातून मिळणार्या पैशातून त्यांनी घरखर्च भागवून तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.
मोठी मुलगी श्रुती शेलार व मुलगा अजित पवार हे आय टी मध्ये नोकरीला लागले अनुजा हिने पण हे नेत्रदीपक यश मिळवले. त्याबद्दल पवार कुटुंबीयांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अनुजाने बोलताना सांगितले की तुमची काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करणे अशक्य नाही फक्त जिद्द, चिकाटी, सातत्य आणि परिस्थितीची आईवडिलांची जाणीव ठेवा एक दिवस नक्की यशस्वी व्हाल.
