मानोरी परिसरात पुन्हा अपघात, दोन तरुण जखमी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील मानोरी महाडूक सेंटर रोडवरील खिळे वस्ती आणि ठुबे वस्ती दरम्यान गुरुवारी झालेल्या कार अपघातात दोन तरुण जखमी झाले. मानोरीकडून माहेगावकडे जाणाऱ्या चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या साईड गटारमध्ये पलटी झाली. सुदैवाने दोन्ही तरुणांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने मानोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाता नंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अक्षय पोटे, अनिल ठुबे, सोमा थोरात, आकाश पोटे तसेच खिळे वस्ती तरुण मंडळाच्या सदस्यांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान केवळ चार, पाच दिवसांपूर्वी रविवारी याच रस्त्यावर आणखी एक अपघात झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था, अयोग्य साईड गटार बांधकाम आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव यामुळे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियते बद्दल संताप व्यक्त करत नागरिकांनी या ठिकाणाला ‘अपघातप्रवण क्षेत्र’ घोषित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
