Type Here to Get Search Results !

राहुरी - राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन

 राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन.



खेळ सोशल मीडियाचा, प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा, स्पर्धेचे आयोजन.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस स्टेशन तर्फे आज दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहरातील राहुरी काॅलेज तसेच विद्यापीठ येथील महात्मा फुले विद्यालय येथे एकता दौडचे आयोजन करून आपल्या राष्ट्राची एकता एकात्मता अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन मुस्कान भाग 2 चा शुभारंभ करण्यात आला.


त्यावेळी दोन्ही शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दहशत होणाऱ्या गुन्ह्यां बाबत अवगत करून असा कुठलाही गुन्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार नाही. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उप विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


ऑपरेशन मुस्कान- भाग 1. 

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत मागील नऊ वर्षांतील अपहरण झालेल्या एकूण 91 मुलींचा शोध दिनांक 1 फेब्रुवारी 2024  पासून घेण्यात यश आले आहे. अजूनही सहा अल्पवयीन मुलींचा कसोशीने शोध सुरू आहे. या मोहिमेद्वारे राहुरी पोलीस स्टेशनकडून अपहरण विरोधी कार्यात नवा मैलाचा दगड निर्माण करण्यात आला आहे.


ऑपरेशन मुस्कान- भाग 2. 

आता दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये, यासाठी जागरूकता मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत शालेय स्तर (इ.8 वी ते 10 वी), महाविद्यालयीन स्तर (इ.11वी ते 12 वी) व पदवीधर स्तर विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि भित्तीपत्रक (चित्रकला) स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.


सदर तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रत्येक गटातील व प्रत्येक स्पर्धा स्वरूपातील प्रथम 3 विजेत्यांना दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशनच्या संकल्पनेतून राहुरी तालुका कलाकार मंच व केअर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दसुर या विशेष कार्यक्रमात पारितोषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास स्नेहालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


स्पर्धेचा विषय 

“खेळ सोशल मीडियाचा, प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा” 


या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत समाजात जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, सशक्त आणि  सजग व्हावे, हा ऑपरेशन मुस्कानचा खरा हेतू आहे.