कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. श्रीकांत पठारे
पारनेर मध्ये शिवसेना उबाठा गटाची जोरदार तयारी
कार्यकर्त्यांची बैठक; निवडणुकीसाठी रणनीती निश्चित
पारनेर/प्रतिनिधी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी पारनेर तालुक्यात सुरू झाली आहे. यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. श्रीकांत पठारे स्वतः जवळा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. सध्या सोशल मीडियावर शिवसेना (उबाठा) गटाबाबत खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेना हा पक्ष पारनेर तालुक्यात भक्कमपणे उभा आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे डॉ. पठारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला असून, निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले असून, मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
