नांदेड - भाजपची तालुकास्तरीय संघटनात्मक बैठक किनवटमध्ये संपन्न....
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट दि,१: - मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची तालुकास्तरीय संघटनात्मक बैठक किनवट येथील साईबाबा मंदिर सभागृहात शुक्रवारी (दि.३१) पार पडली.या बैठकीस मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख आणि आमदार भीमराव केराम प्रमुख उपस्थित होते.पदवीधर तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे यासाठी सर्व शक्तीप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले.तर पक्षाची विचारधारा तळागाळातील आणि नवमतदारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. देशमुख यांनी याप्रसंगी केले.रचनात्मक कार्यामुळे आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार,” असा विश्वास आमदार केराम यांनी व्यक्त केला.या बैठकीस पक्षनिरीक्षक नारायणराव सिरमनवार, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा सौ. संध्याताई राठोड, दिनकरराव चाडावार, शहराध्यक्ष स्वागत आयनेनीवार, दक्षिण मंडळाध्यक्ष सूर्यकांत अरंडकर, उत्तर मंडळाध्यक्ष उमाकांत पाटील कराळे यांच्यासह आजी–माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.युतीसाठी भाजप अनुकूल
आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि इतर मित्रपक्षांशी युतीबाबतचा निर्णय स्थानिक आमदारांवर सोपविण्यात आला असल्याची माहिती संघटनमंत्री व जिल्हाध्यक्षांनी दिली.याबाबत विचारणा केली असता आमदार भीमराव केराम म्हणाले, “भाजप युती करून पालिकेची निवडणूक लढविण्यास अनुकूल आहे. संबंधित पक्षांशी लवकरच चर्चा होईल. महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा किनवट पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
