साईबन येथे ‘हुरडा महोत्सव’चा शानदार शुभारंभ - जगातील पहिला हुरडा
साईबन म्हणजे उजाड माळरानावर साकारलेले हिरवे स्वप्न - आनंद भंडारी
अ.नगर - डॉ. कांकरियांच्या साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ संपन्न झाला. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी व त्यांच्या पत्नी सौ. भंडारी यांच्या हस्ते हुरडयाच्या कणसाचे व ज्यात हुरडा भाजला जातो त्या रांजणाचे पुजन करण्यात आले. सदर प्रसंगी पर्यावरण संघटनेचे प्रमोद मोरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बडीसाजन संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा, संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, शिक्षणतज्ज्ञ पापडीवाल, युरोसर्जन डॉ. पुरूषोत्तम दरख, अभिनेता श्री मोहिनीराज गटणे तसेच साईबनचे संचालक डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते.
श्री आनंद भंडारी म्हणाले की साईबन म्हणजे उजाड माळरानावर साकारलेले हिरवे स्वप्न आहे. अत्यंत कष्टाने व दूरदृष्टीने डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया यांनी हिरवे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. मेडिकल डॉक्टर असुनही पर्यावरणासहित अनेक क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजाला दिशा देणारे आहे. साईबन म्हणजे पर्यावरण, आध्यात्म व विज्ञानाचा त्रिवेणी संगम आहे. इथे छोटया बालकापासून आजी आजोबां पर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आगळा वेगळा आनंद प्राप्त होतो. इथे असणार्या प्राणी, पक्ष्यांबरोबर मैत्री करता येते, निसर्गाचा आनंद घेत मोकळया हवेत इथे असणार्या विविध सुविधांचा लाभ घेता येतो. सर्व कुटुंबियांनी व मित्रमंडळींनी एकत्र येऊन हुरडा खाणे म्हणजे नाते संबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण करणे होय. हुरडया बरोबर अतिशय चविष्ट वनभोजनाचा आस्वाद साईबनमध्ये काही वेगळाच. सुरूवातीला डॉ. प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले. साईबनचा 25 वर्षांचा इतिहास सांगितला. सांडपाण्याचे शुध्दीकरण करून त्या पाण्याव्दारे पडीक जमिनीचा कसा विकास केला याबद्दल माहिती सांगितली. डॉ. सुधा कांकरिया यांनी साईबन मधील मेडिटेशन झोन-साईबन में मधुबन अंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली. बटरफ्लाय गार्डन, मातीविना शेती, यौगिक शेती, नक्षत्र उदयान, रेन डान्स, बैलगाडीची सफर, विविध खेळणी, पपेट शो, बोटींग, अंतराळ सफर सहित अनेक सुविधांचा मनसोक्त आनंद उपस्थित मंडळींनी घेतला.
श्री प्रमोद मोरे म्हणाले की शुध्द हवेच्या बाबतीत आपल्या अहिल्यानगरला देशातील दुसरा क्रमांक प्राप्त झाला. त्यात साईबन येथील हजारो झाडांचा नक्कीच सहभाग आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी साईबनने मोठे योगदान दिले आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वनराई बंधारा वगैरे प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. डॉ. पुरूषोत्तम दरख म्हणाले की साईबन मध्ये आल्यावर एक दिव्य ऊजा प्राप्त होते. ती आम्हाला वर्षभर प्रसन्नता देऊन जाते. म्हणूनआम्ही दरवर्षी हुरडा महोत्सवास उपस्थित रहात असतो. शेवटी सतीश शिंदे यांनी आभार मानले.
