Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची निवड

 अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची निवड



अहिल्यानगर प्रतिनिधी :

अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र असलेले अक्षय कर्डिले यांना संचालकपदाची संधी मिळाल्याने कर्डिले परिवाराचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे चालू राहणार असल्याचे चित्र आहे.


बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संघटनकौशल्य आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे सहकार चळवळीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्याच परंपरेला पुढे नेत अक्षय कर्डिले हे आधुनिक दृष्टिकोनातून बँकेच्या कामकाजाला गती देतील, असा विश्वास सहकार नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.


निवडीनंतर अक्षय कर्डिले यांनी सर्व सभासदांचे आभार मानत, “शेतकरी, व्यापारी व सर्व घटकांच्या हितासाठी पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्यास प्राधान्य देणार आहे. जिल्हा बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने काम करेन,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. युवा नेतृत्वाच्या या नव्या उपस्थितीमुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.