श्रीगोंदा : “शहर विकासासाठी शिवसेना पॅनेलला संधी द्या” – माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :
गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर येत्या मंगळवारी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेना पॅनेलच्या नगराध्यक्ष पदासह सर्व २२ उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पोटे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत श्रीगोंद्याचा विकास जिल्ह्यात नावलौकिक मिळवून देईल. इंदिरा नगर वसाहतीतील रहिवाशांच्या घरकुल प्रश्नाचे समाधान नगरविकास खात्यामार्फत करण्यात येणार आहे.
मनोहर पोटे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. त्याच धर्तीवर श्रीगोंदा नगरपरिषदतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. शहरात सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक रुग्णालय देखील शिंदे यांच्या माध्यमातून उभारले जाईल. ‘लाडकी बहीण’सारख्या अनेक लोकहिताच्या योजना सुरू करून शिंदे यांनी राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
आपल्या कारकिर्दीचा आढावा घेताना पोटे म्हणाले,
“आपल्या साडेसात वर्षांच्या नगराध्यक्ष कार्यकाळात आम्ही प्रत्येक प्रभागात रस्त्यांचे काम, अरुंद मार्गांवर पेव्हिंग ब्लॉक, बाजारात ओटे-शेड, दिवे, बगीचा विकास, ओपन स्पेस डेव्हलपमेंट केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक, क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारक, ईदगाह मैदान विकास अशी अनेक कामे पूर्ण केली. पद हा केवळ मानाचा नसून जनतेच्या प्रश्नांसाठी असतो आणि आम्ही दररोज नगरपरिषदेत उपस्थित राहून ते सोडवले.”
अखेर त्यांनी जनतेला आवाहन केले की, “श्रीगोंद्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.”
