मुलाकडून आई वडिलांना बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेताच्या बांधावर ट्रॅक्टर घालून ज्वारी पिकांचे नुकसान केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेस सावत्र लेक-सुनाने मारहाण करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे घडली आहे.
मंदाबाई राधु सानप रा. कुरणवाडी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, त्यांचा सावत्र मुलगा नवनाथ राधु सानप हा दि. २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास घोरपडवाडी शिवारातील शेतातची ट्रॅक्टरने नांगरट करीत असताना हा ट्रॅक्टर त्यांच्या सामाईक बांधावर घालुन ज्वारी पिकांचे नुकसान करत होता.
म्हणुन त्या त्यास समजावुन सांगत असताना सावत्र मुलगा नवनाथ सानप याने ‘तु ट्रॅक्टरला आडवी येवु नकोस, नाहीतर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालुन मारुन टाकीन, अशी धमकी देवुन माझ्या हाताला धरुन मंदाबाई यांना नांगरटीमध्ये ढकलुन दिले. त्यावेळी त्या खाली पडल्या असता त्यांना त्यांची सून शोभा सानप व शामपल भानुदास (आडनाव माहित नाही) हीने धरुन लाथा बुक्यांनी मारहाण केली.
त्यावेळी मुलगा नवनाथ यांने हातात दगड धरुन त्यांच्या पाठीत मारहाण केली. तेव्हा त्यांचे पती हे सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मुलगा नवनाथ याने शिवीगाळ करुन तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली.
मंदाबाई राधु सानप रा. कुरणवाडी, ता. राहुरी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ राधु सानप, शोभा नवनाथ सानप दोघे रा. कुरणवाडी, ता. राहुरी, शाम्पल भानुदास (आडनाव माहित नाही) व शाम्पल हीचा मुलगा भैय्या (पुर्ण नाव माहीत नाही) रा. राणेगाव शिंगोरी ता. शेवगाव यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. १३३७ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३२४ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
