रेल्वे मार्गासाठी सुपीक व बागायती जमीन संपादन होणार?
रेल्वेप्रश्नी शेतकऱ्यां सोबत उभे राहून शासन दरबारी ठोस पाठपुरावा करणार- अक्षय कर्डिले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी ते शनी शिंगणापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गास शेतकऱ्यांचा विरोध असल्यास त्यांच्या भावना समजून घेत आम्ही पूर्ण ताकदीने शेतकऱ्यां सोबत उभे राहू. तसेच या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसेल याची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा, यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा केला जाईल, असे मत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.
राहुरी- शनी शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुपीक शेती व बागायती जमीन संपादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात कर्डिले म्हणाले की, "विकास आम्हालाही हवा आहे; मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये. शेतकऱ्यांची जमीन, पाणी, रोजगार व भविष्य यांचा विचार न करता एखादा प्रकल्प राबविणे योग्य ठरणार नाही.
शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर त्यांचा विरोध रास्त असून त्यांच्या भावना समजून घेणे ही आमची जबाबदारी आहे." याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा करणार असल्याचे देखील अक्षय कर्डिले यांनी म्हटले आहे.
