बाल चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ.
विद्यार्थी दशेत मिळणारे शिक्षण आणि संस्कार हेच भविष्यातील यशाचा भक्कम पाया- पो. नि. ठेंगे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
विद्यार्थी दशेत मिळणारे शिक्षण आणि संस्कार हेच भविष्यातील यशाचा भक्कम पाया असतात. अभ्यासा बरोबरच कला, चित्रकला व खेळ या सारख्या उपक्रमात सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग व राहुरी तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोबाईलच्या वाढत्या वापरावर भाष्य करताना ठेंगे म्हणाले की, आजच्या काळात मोबाईलचा अतिरेक विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. अयोग्य वापरामुळे अभ्यासावर परिणाम होतोच, शिवाय चुकीच्या सवयी व गुन्हेगारीकडे वळण्याचीही शक्यता निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून अभ्यास, कला व सकारात्मक छंदांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मोहिनीराज तुंबारे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कला ही केवळ छंद नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. चित्रकलेमुळे कल्पकता, निरीक्षणशक्ती, एकाग्रता व सर्जनशील विचार विकसित होतो. नियमित सरावातून गुणवत्तेचा विकास होऊन आत्मविश्वास वाढतो. अभ्यासा बरोबर कलेला योग्य महत्त्व दिल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी चित्रकलेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि लपलेल्या कलागुणांना वाव मिळतो. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक आवडी जोपासण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
गट विकास अधिकारी डॉ. सुरेश तायडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. विजेते तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
राहुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती सोनवणे, संतोष गुलदगड, तालुका संघाचे अध्यक्ष विशाल तागड, उपाध्यक्ष सतीश गुलदगड, सचिव मच्छिंद्र गुलदगड, बाळासाहेब पाचरणे, दत्तात्रय साळवे, प्रसाद बारगजे, छाया काळे, शीतल लोळगे, बाळासाहेब तांबे, शैला ओहळ, हरीश साळवे, योगिता म्हस्के, राजश्री वारुळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन सुनील भुजाडी यांनी केले, तर आभार समीर शेख यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
