Type Here to Get Search Results !

राहुरी - वाहतूक नियम मोडणाऱ्या एसटी बस व खाजगी वाहनांवर कारवाई.


 


वाहतूक नियम मोडणाऱ्या एसटी बस व खाजगी वाहनांवर कारवाई.


४ एसटी बस, २८ खाजगी वाहने अशा एकुण ३२ वाहनांवर कारवाई, २२ हजार रु. दंड वसूल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


नगर–मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहर हद्दीत या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः मुळा नदीवरील पुल परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असून, काही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत विशेष मोहीम राबविली आहे.


राहुरी येथील मुळानदीवरील पुलावरून विरुद्ध दिशेने बस व इतर वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. या कारवाईत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकांसह इतर वाहन चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली. 


एमएच २० बीएल २९८४, एमएच १४ बीएफ ३८२७, एमएच ०७ सी ९२४९ या क्रमांकांच्या अशा एकुण ४ एसटी बसेस, तसेच इतर २८ खाजगी वाहने अशा एकुण ३२ वाहने नगर–मनमाड महामार्गावरून विरुद्ध दिशेने जाताना आढळून आल्याने संबंधित चालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.


नगर–मनमाड महामार्ग हा राहुरी परिसरातील अतिशय महत्त्वाचा व संवेदनशील मार्ग असून, दिवसभर या मार्गावर जड व हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दुरुस्तीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्यास वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.


या पार्श्वभूमीवर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या वाहन चालकां विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. नियम तोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना व वाहन चालकांना आवाहन केले आहे की, नगर–मनमाड महामार्गावरून वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. नियम मोडल्यास यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणाणले असून महामार्गावरील शिस्त सुधारण्यास मदत होत आहे. राहुरी पोलिसांच्या या ठोस भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले असून, भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.