१०० दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत भव्य जनजागृती रॅली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड आदर्श गावात १०० दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत दिनांक १६ जानेवारी रोजी विपला फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यां पालक व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रॅलीमध्ये सर्वांचा एकच नारा, बाल विवाह मुक्त करूया अहिल्यानगर जिल्हा सारा व लेक वाचव लेक शिकवा अशा प्रभावी घोषणा देत संपूर्ण पिंपरी अवघड गावात जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभागामुळे रॅलीचे वातावरण सर्वांसाठी प्रेरणादायी झाले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, उपसरपंच व राहुरी तालुक्यातील शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनामुळे रॅली सुरळीत व प्रभावीपणे पार पडली. याबद्दल त्यांचे विशेष आभार विपला फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
रॅलीनंतर विपला फाऊंडेशन यांच्या वतीने श्री. संदेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क व बालविवाह या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व आणि कायदेशीर बाबी याविषयी सोप्या शब्दांत माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. याप्रसंगी उपस्थित सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक सर्वांनीच बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा घेतली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढवणारा ठरला असून, बालविवाह मुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
