पशुपालकांना अल्प दरात बायोगॅस सुविधा उपलब्ध करून देणार- केशवराव शिंदे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नवप्रभा प्रकल्पांतर्गत सौ. संगीता दत्तात्रेय धोंडे यांनी सुरू केलेल्या अमृतधारा दूध संकलन केंद्राचे उद्घाटन सडे येथे दैवत उद्योग समूहाचे चेअरमन केशवराव शिंदे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मच्छिंद्र धोंडे होते. आपल्या प्रास्ताविक पर भाषणात बोलताना केशवराव शिंदे यांनी नवप्रभा प्रकल्पाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, केंद्राद्वारे स्वच्छ दूध उत्पादन, महिला पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत दुग्ध व्यवसायाला चालना दिली जात आहे. याप्रसंगी त्यांनी महिला पशुपालकांना अल्प दरात घरगुती बायोगॅस प्लांट उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासित केले. ज्यामुळे एलपीजीवरील खर्चात बचत होईल, धूरमुक्त आणि आरोग्यदायी स्वयंपाक शक्य होईल तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे.
अमृतधारा दूध संकलन केंद्रामध्ये दूध थेट महिला पशुपालकांकडून खरेदी केले जाते आणि होणारे संपूर्ण पेमेंट थेट बँक खात्यात जमा केले जाते. यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढते, घरखर्च, बचत, शिक्षण आणि आरोग्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. केंद्रा मार्फत ताजे, स्वच्छ आणि दर्जेदार दुधाला अतिरिक्त दर आणि दिवाळी बोनस दिला जातो.
केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते. संतुलित पशुखाद्य, पशुसंवर्धन, जनावरांचे आरोग्य, स्वच्छ दूध उत्पादन आणि उत्पादन वाढ याबाबत माहिती दिली जाते. विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तज्ज्ञ शेतकऱ्यांना आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान, पशुखाद्य, आरोग्य व्यवस्थापन, बायोगॅस व सेंद्रिय खत याबाबत मार्गदर्शन करतात. तसेच वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून कर्ज, विमा आणि इतर सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
उद्घाटन सोहळ्यात डॉ. सरोज वहाणे, महाव्यवस्थापक, राहुरी सीमेन स्टेशन यांनी उपस्थितांना एनडीडीबी डेरी सर्विसेस मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. संतोष कवाणे, कमलेश कोळसे (ओपन कॉमर्स प्रा. लि., बंगळूरू), सुशील म्हस्के (ज्येष्ठ व्यवसाय विकास अधिकारी, अॅनिमेटा प्रा. लि.), सागर फटांगरे (संघप्रमुख, सह्याद्री अॅग्रोव्हेट, संगमनेर), अमोल थोरात, भाऊसाहेब शेंडगे (शिवम इन्फोटेक, राहुरी) श्री. श्रेयस शिंदे (एकादस ऍग्रो) तसेच एचडीएफसी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.लक्ष्मण धोंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महिला पशुपालकांचा हळदीकुंकवाचा समारंभ पार पडला महिला पशुपालकांना ॲनिमेटा व एनडीडीबी मार्फत विविध शैक्षणिक साहित्याचे व औषधांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून दैवत दीदी, नवनाथ चे अधिकारी कर्मचारी तसेच श्री. दत्तात्रय धोंडे, श्री. विशाल वाघ, श्री. निखिल धोंडे, श्री. रेवतीनाथ धोंडे, श्री. राजेंद्र चोरमुंगे, श्री. किरण जाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल धोंडे यांनी तर आभार डॉ. लक्ष्मण धोंडे यांनी मांडले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपआहाराचे नियोजन करण्यात आले होते.
