Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आरोपी केव्हा पकडणार ? - महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे साहेबराव म्हसे यांचा सवाल, आंदोलनाचा इशारा.


 


शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आरोपी केव्हा पकडणार?


महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे साहेबराव म्हसे यांचा सवाल, आंदोलनाचा इशारा.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


 मागील वर्षी येथील श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यावरून शिवप्रेमींनी जिल्ह्यात आंदोलन केले. या घटनेचा निषेध केला, मात्र वर्ष होत असतानाही अद्याप पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागला नाही. आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, विटंबना करणार्‍या आरोपीस तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे साहेबराव पाटीलबा म्हसे यांनी प्रशासनाला दिला आहे.


दि. 26 मार्च 2025 रोजी राहुरी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळे फासून विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेला जवळपास वर्ष उलटून गेले तरी संबंधित आरोपीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींनी शांततेच्या मार्गाने शहर बंद ठेवून आपला निषेध नोंदवला होता.


त्यावेळी पोलिसांनी आरोपींचा शोध लागल्याची माहिती देऊनही आरोपी पकडण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी शिवप्रेमींची घोर फसवणूक केली असून आमच्या तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही, असा गर्भित इशारा म्हसे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत तहसीलदार डॉ.अमित पवार यांना दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान दि. 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होणार असून, त्यापूर्वी आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या निवेदनाची प्रत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनाही देण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. यावेळी अर्जुन म्हसे, पत्रकार रुक्मिणीकांत म्हसे सुनील हिवाळे, दादासाहेब म्हसे, बजरंग म्हसे, सुनील म्हसे, पोपट औटी, पोपट माळवदे, अनिल म्हसे, दत्तात्रय म्हसे, देवेंद्र लांबे, प्रकाश नवले, अशोक म्हसे, दीपक नवले, बंटी म्हसे, विकास म्हसे, गणेश अहिरे, गोकुळ म्हसे, भीमराज बोरकर, बाळासाहेब म्हसे, अनिल पेरणे, योगेश म्हसे आदींसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.