गोटुंबे आखाडा येथे महाशिवरात्र निमित्त तीन दिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील श्री महादेव देवस्थान येथे महाशिवरात्र उत्सवा निमित्त सालाबाद प्रमाणे यंदा १७ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण गाव हरिनामाच्या गजरात आणि शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
या कीर्तन महोत्सवाची सुरुवात शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महादेव मंदिर देवस्थान मंडळाच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थ, विविध देवस्थानांचे पदाधिकारी, गावातील तरुण मंडळे, महिला भजनी मंडळ तसेच परिसरातील भजनी मंडळांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. निलेशजी महाराज रोडे (गोणेगाव) यांचे कीर्तन रंगले. महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी ह.भ.प. कु. निकिताताई महाराज आगलावे यांनी भावपूर्ण कीर्तन सादर केले. तर सोमवारी, दि. १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. स्वरमूर्ती श्री. प्रकाश महाराज आव्हाड (दरेवाडी) यांचे काल्याचे कीर्तन अत्यंत भक्तिभावात पार पडले. उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा मनोभावे आस्वाद घेतला.
शनिवारचे अन्नदाते शिवभक्त अशोक लवांडे होते. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पहाटे श्री महादेवाला विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक कावड मिरवणूक गावातून काढण्यात आली. सकाळी ९.३० वाजता विशेष पूजाही पार पडली. महाशिवरात्रीच्या दिवशी कै. दत्तात्रय मोहन शेटे यांच्या स्मरणार्थ सकाळी व सायंकाळी शिवभक्त मच्छिंद्र शंकर डहाळे यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी शिवभजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
सोमवारी ह.भ.प. प्रकाश महाराज आव्हाड यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाचे अन्नदाते समस्त ग्रामस्थ व महादेव मंदिर देवस्थान मंडळ होते.या महोत्सवाचे आयोजन महादेव मंदिर देवस्थान मंडळ व कृती समिती, गोटुंबे आखाडा यांच्या वतीने करण्यात आले.
ग्रामस्थ, तरुण मंडळे व भजनी मंडळांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाशिवरात्र उत्सवानिमित्त आयोजित या कीर्तन महोत्सवाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेतला.
