Type Here to Get Search Results !

राहुरी - चोरीस गेलेले सोन्याचे दागीने फिर्यादी परत करण्यात आले

 चोरीस गेलेले सोन्याचे दागीने फिर्यादी परत करण्यात आले.



अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते साडे दहा तोळे सोन्याचे दागीने फिर्यादीच्या सुपूर्द.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरातील भास्कर कोळी यांचे घर फोडून आरोपींनी साडेदहा तोळे सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केले. अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल भास्कर कोळी यांना परत देण्यात आला. 


भास्कर भागवत कोळी, रा. राहुरी यांच्या घरात घुसून चोरट्यांनी १५ लाखांचे साडे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. या बाबत भास्कर कोळी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी तपासाची चक्रे फिरविली.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे मुख्तार मेहबूब शेख, वय ३४ वर्षे व शाहरुख शेखलाल शेख, वय ३२ वर्षे, दोघे रा. पाचोरा, जि. जळगांव, या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कलम वाढवून न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यामध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. 


आरोपींनी साडेतीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार, दीड तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, दोन तोळे वजनाचे सोन्याचे झुमके, दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, सोन्याची नथ, सोन्याची अंगठी असे १५ लाखांचे साडे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, बँकेचे पासबुक व इतर कागदपत्रे असा मुद्देमाल चोरी केला होता. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीच्या साडे दहा तोळे वजनाच्या दागिन्यांची तयार केलेली सोन्याची लगड पोलिसांना काढून दिली. 


अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते जप्त केलेले सोने भास्कर कोळी यांना परत देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उप विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे उपस्थित होते.