Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगर : जुनून वुमन्स क्रिकेट लीगमधून महिला डॉक्टरांच्या फिटनेसचा प्रेरणादायी उत्सव

 जुनून वुमन्स क्रिकेट लीगमधून महिला डॉक्टरांच्या फिटनेसचा प्रेरणादायी उत्सव

- सुपर क्विन्स विजेता तर आणि छावा संघ उपविजेता  

छत्रपती संभाजीनगर :



इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), छत्रपती संभाजीनगर तर्फे आणि वीणा वर्ल्ड वेदांत यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘आयएमए वुमन्स क्रिकेट लीग’ ही महिला डॉक्टरांसाठीची विशेष क्रिकेट स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी समृद्धी टर्फ येथे उत्साहात पार पडली. आयएमए स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. गीतेश दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या लीगने केवळ क्रिकेटपुरती मर्यादा न ठेवता मैत्री, शिस्त, टीमवर्क आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. शहरातील तब्बल ४२ महिला डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत मैदानावर चौकार–षटकारांची आतषबाजी केली.

वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून स्वतःच्या फिटनेससाठी मैदानात उतरणाऱ्या महिला डॉक्टरांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या लीगचा दर्जा प्रत्येक वर्षी उंचावत आहे. ‘फिट इंडिया’चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमुळे प्रभावीपणे पुढे आला.

स्पर्धेसाठी खेळाडूंना विविध गटांमध्ये विभागून सहा नव्या कॅप्टन्सची निवड करण्यात आली. चिठ्ठी काढून संघरचना करण्यात आल्याने सर्व संघ संतुलित तयार झाले. प्रत्येक कॅप्टनने आपल्या संघासोबत नियोजनबद्ध सराव केला. हेल्दी स्पर्धात्मक वातावरणात खेळाडूंनी दररोज सराव सत्रे घेतली.

स्पर्धा दोन पूलमध्ये सहा संघ अशा स्वरूपात झाली. प्रत्येक पूलमध्ये तीन सामने खेळवण्यात आले. त्यानंतर दोन उपांत्य फेरीचे सामने आणि एक अंतिम सामना रंगला. अंतिम सामन्यात ‘सुपर क्वीन्स’ संघाने डॉ. मेघा डामा यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले, तर डॉ. सोनाली सावजी यांच्या नेतृत्वाखाली ‘छावा’संघ उपविजेता ठरला.

डॉ. प्रगती बुकन यांच्या कॅप्टनशिप अंतर्गत धुरंधर, डॉ. बेनझीर जाधव यांच्या कॅप्टनशिप अंतर्गत एवरग्रीन चॅम्पियन्स, डॉ. किरण मुंदडा यांच्या कॅप्टनशिप अंतर्गत फिनिक्स स्ट्रायकर, डॉ. आरती मांगुळकर यांच्या कॅप्टनशिप अंतर्गत तूफानी संघाने उत्कृष्ट कामगिरी केली.


प्रमुख पुरस्कार :

वुमन ऑफ द सिरीज – डॉ. सोनाली सावजी

बेस्ट बॅट्सवुमन – डॉ. वंदना काबरा 

बेस्ट बॉलर – डॉ. प्रिया देशमुख

प्रत्येक सामन्यासाठी ‘वुमन ऑफ द मॅच’ पुरस्कार डॉ. बेनझीर जाधव, डॉ. नमिता सोनी, डॉ. सुनीता जक्कल, डॉ. वंदना काबरा, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. सोनाली सावजी आणि डॉ. आरती मांगुळकर यांना प्रदान करण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. यशवंत गाडे, डॉ. योगेश लक्कास, डॉ. शिवाजी पोले,  डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. अर्चना साने,  डॉ.अंजली गाडे,  संभाजी चिंतले, डॉ. राजीव मुंदडा, डाॅ. गीरीश चिरलीकर. श्री. वेदांत रत्नपारखी आणि डॉ. गीतेश दळवी,  यांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून करण्यात आले. पावभाजी, चहा, समोसे, एनर्जील, निम्बू पानी, चहा, गुळाचा शिरा आणि टॅटूज यामुळे जल्लोषपूर्ण वातावरण तयार झाले. आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर आणि सचिव डॉ. योगेश लक्कास यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिला डॉक्टरांच्या उत्साहाचे अभिनंदन केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. गीतेश दळवी, डॉ. वंदना काबरा, डॉ. सोनाली सावजी, डॉ. प्रिया देशमुख आणि डॉ. असावरी टाकळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.  व्यस्त जीवनातही स्वतःसाठी वेळ काढून आरोग्य जपणे किती आवश्यक आहे, हा संदेश ‘जुनून वुमन्स क्रिकेट लीग’ने प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला आहे.