५० दुचाकीस्वारांवर कारवाई, ५० हजार रुपयांचा दंड वसूल.
दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा- पो. नि. संजय ठेंगे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
प्राणघातक अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या सूचनेनुसार राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्या ५० दुचाकीस्वारांवर कारवाई करत एकूण ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन- २०२४ मध्ये ५७ तर सन- २०२५ मध्ये ५८ असे एकूण ११५ प्राणघातक अपघात झाले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता. ही बाब लक्षात घेता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विना हेल्मेट दुचाकी चालवणार्यां विरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून भविष्यातही अशाच प्रकारची नियमित व कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले आहे. नगर- मनमाड महामार्गावरून प्रवास करणार्या सर्व दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, रमेश दरेकर व बापू फुलमाळी यांनी केली.
