यंदाची शिवजयंती पोलीस ठाण्याच्या दारात ?
विटंबना प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट, शिवजयंती उत्सव समितीचा आक्रमक पवित्रा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होत असताना, राहुरीमध्ये मात्र यंदाचा शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि निषेध स्वरूपात साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या शिवरायांच्या मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने, मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित शिवजयंती उत्सव समितीने यंदाची शिवजयंती थेट राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी २६ मार्च २०२५ रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा निंदनीय प्रकार घडला होता. या घटनेनंतर शिव प्रेमींनी शांततेच्या मार्गाने शहर बंद ठेवून आपला निषेध नोंदवला होता. त्यावेळी प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला आता वर्ष पूर्ण होत आले तरी पोलीस प्रशासनाला आरोपींचा सुगावा लागलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी उत्सव समितीने यंदा गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोलीस स्टेशनच्या आवारातच शिव जयंती साजरी करण्याचे पत्र तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे. विशेष म्हणजे, समितीने राहुरीतील सर्व शासकीय कार्यालयांना निमंत्रण पत्रिका पाठवून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
प्रशासन शिवरायांच्या विटंबनेच्या बाबतीत गंभीर दिसत नाही. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. म्हणूनच यंदा शिवरायांचा पाळणा प्रशासनाच्या दारात हलणार आहे. अशी माहीती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
