अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त.
पोलिस पथकाने मुद्देमाल जप्त करून एका महिलेला ताब्यात घेऊन कारवाई केली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील दत्तनगर, राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एका महिलेला राहुरी पोलिसांनी रंगेहात पकडले असून तिच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११.४५ च्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील दत्तनगर येथे छापा टाकला. या कारवाईत आरोपी संगीता संदीप गायकवाड, वय ३६ वर्षे, हिच्या ताब्यातून प्रत्येकी १०० रुपये किमतीचे १० लिटर गावठी हातभट्टीचे प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके हे करीत आहेत.
