दूध भेसळ प्रकरणाचा सखोल तपास व्हावा.
मानवाधिकार संरक्षण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मानव अधिकार संरक्षण समितीच्यावतीने निवासी उप जिल्हाधिकारी दादासाहेब गीते व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले की, देवळाली प्रवरा परिसरातील एका गोडाऊनमध्ये पॅराफिन (मिनरल ऑईल) व विविध रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणातून घातक क्रीम तयार करून त्यापासून मोठ्या प्रमाणावर बनावट दूध निर्मिती केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बनावट दूध राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तसेच बीड जिल्ह्यात पुरवले जात असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि कायद्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर गुन्हा असून संबंधित मुख्य सूत्रधार व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी बनावट क्रीम तयार केली जात होती, त्या ठिकाणांची सखोल तपासणी करून सर्व पुरावे जप्त करावेत. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमावे.
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे , जिल्हा संघटक लिंबाजी इंगावले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय गडाख, जिल्हा निरीक्षक भिकचंद वरगुडे, जिल्हा नेते प्रभाकर संसारे आदी उपस्थित होते.
