जप्त करून सील केलेल्या घरात प्रवेश, तिघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या गहाण मालमत्तेचे सील तोडून आत प्रवेश केल्या प्रकरणी तिघां विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोलीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भारत तुळशीराम खरात रा. येसगाव ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, मल्हारवाडी ता. राहुरी, जि. अहिल्यानगर मिळकत क्र. 19, घर क्र. 946/1, गणेश मंदिरा जवळील मालमत्तेवर बाबासाहेब भगवान जाधव यांनी सुमारे 26 लाख 64 हजार 636 रुपयांचे गहाण कर्ज घेतले होते.
फेब्रुवारी 2021 पर्यंत हप्ते नियमित भरल्यानंतर संबंधितांनी कर्जफेड थकविल्याने कंपनीने जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथे दावा दाखल केला होता. दि. 21 जानेवारी 2026 रोजी न्यायालयाने कोर्ट नियुक्त करून गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सशुल्क बंदोबस्तात सदर मालमत्तेचा ताबा घेऊन ती सील करण्यात आली होती.
मात्र दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पाहणीस गेले असता, संबंधित सील तोडून आत प्रवेश करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच बाबासाहेब भगवान कल्पना बाबासाहेब जाधव व विक्रम बाबासाहेब जाधव (सर्व रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) हे त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे आढळून आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयीन आदेशा नंतर ताब्यात दिलेल्या मालमत्तेत अनधिकृत प्रवेश केल्या प्रकरणी संबंधित तिघां विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. 181/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 329 (3), 329 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
