Type Here to Get Search Results !

राहुरी - जागतिक महिला दिनानिमित्त सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

 जागतिक महिला दिनानिमित्त सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


 राहुरी नगरपालिका व महिला बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त राजमाता जिजाऊ जागतिक महिला दिन उत्सवाचे भव्य आयोजन दि. ६ मार्च ते ११ मार्च दरम्यान करण्यात आले आहे.


सदर कार्यक्रम मा. नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुजाताताई तनपुरे, सौ. सोनालीताई तनपुरे व सायलीताई तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच महिलांसाठी मॅरेथॉन व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून डान्स स्पर्धा, रील कॉम्पिटेशन, पाककला स्पर्धा, रांगोळी, फॅशन शो आदी विविध स्पर्धांचा समावेश आहे. 


तसेच महिला बचत गटांच्या विशेष स्टॉल उभारून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पार पडणार आहेत.


महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. स्मिता भुजाडी यांनी माहिती देताना सांगितले की, महिला दिनानिमित्त सहा दिवस हे कार्यक्रम सुरू राहणार असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात. या उद्देशाने बचत गटांना स्टॉल करून देण्यात येणार आहेत. स्टॉल नोंदणीसाठी नगरपरिषद कार्यालयात संपर्क करावा तसेच मॅरेथॉन व क्रिकेट स्पर्धेसाठी स्वतंत्र नोंदणी करावी.


सदर कार्यक्रमात शुक्रवार दि. ६ मार्च रोजी पतंजली योगा ग्रुपतर्फे 'ॐकार भगवद्गीता' १२ वा अध्याय पठण, दुपारी ४ वाजता महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर डॉ. ज्योती कोहकडे यांचे व्याख्यान व ग्रुप डान्स स्पर्धा, रील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवार दि. ७ मार्च रोजी सकाळी ६ वा. महिला मॅरेथॉन (ड्रेस कोड काळा टी शर्ट), सायंकाळी गणेश शिंदे यांचे 'संगीत रजनी' कार्यक्रम. रविवार दि. ८ मार्च रोजी तांदूळ व खजूरापासून (गूळ-साखर विरहित) पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, रंगपंचमी निमित्त फनी गेम्स. 


सोमवार दि. ९ मार्च रांगोळी दंतरोग व स्किन केअर तपासणी शिबीर, हस्तकला प्रदर्शन व विक्री, 'खेळ पैठणीचा'. मंगळवार दि. १० मार्च रोजी दुपारी महिला क्रिकेट स्पर्धा (प्रत्येक संघात ९ खेळाडू, त्यात ४ युवती अनिवार्य) बुधवार दि. ११ मार्च रोजी फॅशन शो व समारोप सोहळा तसेच बक्षीस वितरण. दि. ६ ते ११ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३ ते ९ या वेळेत बचत गटांचे स्टॉल सुरू राहणार आहेत.


महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित हा महिला दिन उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला बाल कल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी, सदस्या लताबाई जगधने, संगिता जाधव, सिंधूताई डावखर, वृषाली तनपुरे, आस्मा शेख, प्रियंका काशिद, प्रसन्ना वराळे, मनिषा भोंगळ, मनिषा बर्डे तसेच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उप नगराध्यक्ष गजानन सातभाई आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.