Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - कोंढापुरी येथील शेतक-याचा तळेगाव ढमढेरे शिक्षण संस्थेला मदतनिधी


 


कोंढापुरी येथील शेतक-याचा तळेगाव ढमढेरे शिक्षण संस्थेला मदतनिधी 

          

प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर

                शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील प्रगतशील शेतकरी, पत्रकार विजयराव ढमढेरे यांनी त्यांचे वडील कै.श्री.संभाजीराव गोविंदराव ढमढेरे गुरूजी तसेच आई कै.सौ.सिताबाई संभाजीराव ढमढेरे यांच्या स्मरणार्थ तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाला पंचवीस हजार एक रूपयांचा (२५००१/- रूपये ) मदतनिधी शिरूर येथील जेष्ठ पत्रकार, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.नितीनकुमार बारवकर यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव श्री.अरविंददादा साहेबराव ढमढेरे,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.महेशबापू ढमढेरे,  पत्रकार सागर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडीत, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.मोहन ओमासे ,प्रा.कुंडलिक कदम,मुख्य लिपिक श्री.दत्तात्रय वडघुले ,श्री.नामदेव भोईटे‌ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच दिला.

प्रा.कुंडलिक कदम,प्रा.नामदेव भोईटे यांनी हा मदतनिधी स्विकारला.

शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यावेळी बोलताना म्हणाले,गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे भरीव पवित्र काम या संस्थेत केले जाते आपण दिलेल्या देणगीचा विनियोग शेवटच्या घटकांपर्यंत निश्चितच होईल, संस्था आपल्या ऋणात राहील.

दिलेल्या मदतनिधी बाबत बोलताना पत्रकार, शेतकरी विजय ढमढेरे यांनी सांगितले,माझे वडील कै.संभाजीराव ढमढेरे गुरूजी हे तळेगाव ढमढेरे परिसरातील कासारी,माळीमळा या गावात प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी जोडव्यवसाय म्हणून सकाळी, संध्याकाळी किराणा दुकानदारीही केली. शाळेला जाताना -येताना ते सायकलचा वापर करत होते.शाळा सुटल्यानंतर ते किराणा दुकानाचे मटेरियल सायकलवर आणत होते.ते जावून -येवून पंधरा -सोळा  किलोमीटर अंतराचा दररोजचा प्रवास सायकलवर  त्याकाळी करत होते.सेवानिवृत्तीनंतर ते तळेगाव ढमढेरे या त्यांच्या गावी राहाण्यासाठी गेले. हा मदतनिधी मी शेती उत्पन्नातून मिळविलेल्या कष्टाच्या पैशांतून देत आहे.  सध्याच्या परिस्थितीत अनेक पालकांना त्यांच्या मुला मुलींना उच्च  शिक्षण देणे अवघड होवून बसले आहे.शिरूर तालुक्यात नावाजलेली  ही शिक्षणसंस्था आमच्या तळेगाव ढमढेरे गावातीलच असल्याने हा मदतनिधी देताना मला सार्थ अभिमान वाटत आहे.

           ----------------