Type Here to Get Search Results !

राहुरी - बिबट्याचा वाढता धुमाकूळ, वन खात्याच्या कामकाजावर शेतकऱ्यांचा संताप

 बिबट्याचा वाढता धुमाकूळ, वन खात्याच्या कामकाजावर शेतकऱ्यांचा संताप.



शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने धोका कायम- अशोक पटारे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील वांबोरी गाव व परिसरात बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा बिबट्या दिसल्याच्या घटना समोर येत असताना वन खात्याची कामगिरी मात्र अत्यंत अपुरी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.


मागील दोन वर्षांच्या कालावधीत वन खात्याने वांबोरी व परिसरात पिंजरे लावून नेमके किती बिबटे पकडले. याची कोणतीही स्पष्ट माहिती ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही. फक्त पिंजरे आणून ठेवणे एवढ्यावरच वन खात्याचे काम मर्यादित राहिल्याचा आरोप केला जात आहे. पिंजरे योग्य ठिकाणी कसे लावायचे, कोणत्या भागात जास्त धोका असतो, कोणती खबरदारी घ्यायची, भक्ष कशा पद्धतीने ठेवायचे याबाबत शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने धोका कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मारले गेलेल्या अनेक घटनांमध्ये संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का नाही, किती मिळाली, याबाबतही कोणतीही पारदर्शक माहिती दिली जात नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पंचनामा, अर्ज प्रक्रिया आणि पाठपुरावा याबाबत शेतकरी पूर्णपणे अंधारात असल्याने अनेकांना नुकसान सहन करावे लागत आहे.


वन खात्याने ही बाब केवळ औपचारिकता म्हणून न पाहता जबाबदारीने काम करत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये योग्य जनजागृती करावी, पिंजरे योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी लावावेत तसेच नुकसान भरपाई बाबत पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी ठाम मागणी वांबोरी येथील अशोक उत्तमराव पटारे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.