Type Here to Get Search Results !

पुणे - तिजोरीच्या चाव्या अनुभवी हातातच!’ स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले आघाडीवर,भाजपमध्ये जोरदार हालचाली


 


तिजोरीच्या चाव्या अनुभवी हातातच!’ स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले आघाडीवर,भाजपमध्ये जोरदार हालचाली


पुणे प्रतिनिधी (अमोल उदमले): पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकडे लागले आहे. महापालिकेची ‘तिजोरी’ ज्याच्या हाती, त्याच्याकडे प्रत्यक्ष सत्ता—या समीकरणामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच भाजपमधील इच्छुक नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फील्डिंग सुरू केली आहे.

स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची नियुक्ती होणार असून, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य असणार आहे. भाजपच्या १२ सदस्यांमधूनच स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाणार असल्याने, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वाधिक वजनदार मानले जात आहे. महापालिकेतील प्रदीर्घ अनुभव, प्रशासनावरची पकड, तसेच आर्थिक शिस्तीबाबतची ठाम भूमिका यामुळे भिमाले यांच्याकडे वरिष्ठ नेत्यांचा विश्वास असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ‘तिजोरीच्या चाव्या अनुभवी आणि विश्वासू हातातच हव्यात,’ अशी भूमिका पक्षनेतृत्वाची असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, अनिल उर्फ बॉबी टिंगरे, उमेश गायकवाड, हरिदास चरवड, मारुती तुपे आदींची नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्ष निर्णयाच्या टप्प्यावर श्रीनाथ भिमाले यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात महापालिकेच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवणे, विकासकामांना गती देणे आणि राजकीय समतोल राखणे या दृष्टीने भिमाले हेच ‘सेफ बेट’ ठरू शकतात, असा सूर भाजपमध्ये उमटत आहे.

आता अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होणार असून, स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. मात्र सध्याच्या घडीला, तिजोरीच्या चाव्या श्रीनाथ भिमाले यांच्या हाती जाण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.