विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी, अनेक कामे प्रगती पथावर.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी नगरपरिषदेत विकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना गती मिळाली असून अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या कामांपैकी काही कामे सुरू झाली असून काही कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व विकास आघाडीचे गटनेते हर्षदादा तनपुरे यांनी दिली.
राहुरी बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे आणि माजी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरिषदेत विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मुळा धरणाच्या पाण्याच्या टाकी परिसरात वीज बचतीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा सोलार पॉवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणाची कामे मंजूर झाली आहेत. यात राजश्री हॉटेल मागील रस्ता ते काळे आखाडा परिसर, राहुरी कॉलेज मागील रस्ता ते दिनकर पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता, केशर मंगल कार्यालय कॉर्नर ते धावडे प्लॉट ओपन स्पेसपर्यंतचा रस्ता, तसेच प्रकाश अरगडे घर ते शिंदे सर घर व अनिल कोळसे घराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय नगरपरिषद हद्दीतील नावघाट येथील सुधारणा व खंडोबा मळा परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गतही विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये येवले आखाडा परिसरातील अमरधाम ते सुधाकर मुरली जाधव वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण, मुलनमाथा येथील अंगणवाडीला कंपाऊंड वॉल, डौले वस्ती ते काळे आखाडा पुलापर्यंत रस्ता खडीकरण, कानिफनाथ चौक ते क्रांती चौक रस्ता खडीकरण, तांदुळवाडी येथील नूतन मराठी शाळेत शौचालय बांधकाम व इतर विकासकामे, पुरुषोत्तम नगर येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, तसेच येवले आखाडा परिसरातील अमरधाम ते रवि येवले वस्तीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण आणि तनपुरे खळवाडी येथील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण या कामांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत वैयक्तिक घरकुल (BLC) घटक क्रमांक १ मध्ये राहुरी नगरपरिषद हद्दीतील एकूण १५५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. नगराध्यक्ष व गटनेते यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. ही योजना अद्याप सुरू असून इच्छुक लाभार्थ्यांनी राहुरी नगरपरिषदेत संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नजीकच्या काळात राहुरी नगरपरिषद हद्दीतील उर्वरित रस्त्यांची कामेही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्षदादा तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई तसेच विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दिली.
