Type Here to Get Search Results !

पुणे - हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव

 हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव



रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या भव्य नियोजनात ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दिमाखदार समारोप; महेंद्र गायकवाड उपविजेता


पुणे प्रतिनिधी : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कुस्तीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषमय वातावरणात हा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.


६८ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने, तर गादी विभागात नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने दिमाखदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी आता सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगतदार लढत झाली.विशेष म्हणजे, हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाड्यात सराव करणारे आहेत. त्यामुळे अंतिम सामना अधिकच उत्कंठावर्धक ठरली.


माती विभागातील उपांत्य लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर ३-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच अटीतटीची, तुल्यबळ आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही लढत ठरली. बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्रने आक्रमक खेळाची सुरुवात करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. अनेक मैदानं गाजवलेल्या या दोन्ही दावेदारांमधील सामना कुस्तीशौकिनांसाठी उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ठरला.


गादी विभागातील उपांत्य फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासूनच खेमीची पकड घेत गुण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.


स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी, “केवळ ३७ दिवसांत ही स्पर्धा भरवण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले आणि ते वाघोली ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. विजेत्या मल्लांना भरघोस पारितोषिक देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला. कुस्तीची ग्रामीण चौकट मोडून ती शहरात आली पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्रानेही कुस्तीला राजाश्रय द्यावा, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे,” असे सांगितले.


शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “लहानपणापासून मुलांमध्ये खेळाची आवड आणि संस्कार रुजावेत यासाठी विशेष क्रीडा शाळा सुरू करण्यात येणार आहेत.” त्यांनी आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक केले.


आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके म्हणाले, “आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांनीच कुस्तीमध्ये मोठी पदके जिंकली आहेत. पुण्यातील बालेवाडी, डोणजे येथील क्रीडांगणांप्रमाणेच लोणीकंद येथेही भव्य, उच्च तांत्रिक क्रीडांगण उभे राहणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे.”


कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आयोजकांचे कौतुक करत, “अतिशय भव्य मैदान उभारण्यात आले आहे. याच मैदानातून भविष्यात ऑलिम्पिकपटू घडतील. कुस्तीपटूंना येणाऱ्या अडचणींमध्ये सरकार पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल,” अशी ग्वाही दिली.


या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक मान्यवर उपस्थित होते.


राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेच्या प्रतिष्ठेत मोठी भर पडली. विविध संस्थांचे पदाधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले.


वाघोलीत उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडानगरीत पार पडलेली ही स्पर्धा केवळ कुस्तीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा उत्सव ठरली. राज्यभरातून आलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याची छाप पाडली, तर हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपातील आयोजनामुळे सर्व स्तरांतून रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र केसरीसारख्या मानाच्या स्पर्धेचे वैभव या यशस्वी समारोपामुळे अधिक उंचावल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.