Type Here to Get Search Results !

राहुरी - ५ ते ९ एप्रिल या पाच दिवसाच्या कालावधीत श्री खंडेराया महाराज याञा उत्सव.

 



५ ते ९ एप्रिल या पाच दिवसाच्या कालावधीत श्री खंडेराया महाराज याञा उत्सव.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


भव्य बैलगाडा शर्यत, कुस्त्याचा जंगी हगामा यासह विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमाने राहुरीच्या श्री खंडेराया महाराजांची भव्यदिव्य याञा संपन्न होत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिली.


५ ते ९ एप्रिल या पाच दिवसाच्या कालावधीत श्री खंडेराया महाराज याञा होणार असल्याने याञेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रविवार ५ एप्रिलला सकाळी ९ वाजता श्रीक्षेञ पुणतांबा येथून गंगेचे पाणी  कावडीने आणणा-या कावड भक्तांची पारंपारिक वाद्याच्या गजरात भंडा-याची उधळण करत शहरातुन मिरवणूक काढण्यात येणार आहे.


सकाळी साडेदहा वाजता श्री खंडेराया महाराज, म्हाळसा, बानू यांच्या मुर्तीला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातल्या नंतर याञेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजता याञेचे मुख्य आकर्षण असलेल्या भक्ताच्या कमरेला नाडा बांधून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. राञी ८ वाजता छबीना, बारा वाजता मुळा नदीच्या पाञाजवळ शोभेच्या दारु उडवली जाणार आहे.


सोमवारी सकाळी वाघ्या, मुरळी, पोतराज तसेच विविध क्षेत्रातील कलाकार आपली पारंपारिक कला सादर करणार आहेत. सोमवारी दुपारी नगर मनमाड राज्य महामार्गालगत बारागाव नांदूर रोडवरील बिहाणी मळ्यात कुस्त्याचा भव्य हगामा भरणार आहे. हगाम्यासाठी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील नामवंत पहिलवान हजेरी लावणार आहेत.


बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत राहुरी रेल्वे स्टेशन जवळील आय.टी.आय. काॅलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मैदानावर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत प्रथम क्रमांक ७१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २१ हजार रुपये, पाचवा क्रमांक ११ हजार, सहावा क्रमांक ७ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमां नुसार ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे.


पाच दिवस चालणा-या श्री खंडेराया महाराज याञा व विवीध कार्यक्रम पार पाडण्यासाठी  देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, याञा कमेटी अध्यक्ष विलास वराळे, माजी नगरसेवक सुनिल पवार, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, राजेंद्र वाडेकर, शिवाजी वराळे, अशोक वामन, रावसाहेब हरिश्चंद्रे, राजेंद्र वराळे, उपाध्यक्ष तुषार पवार, गौरव तोडमल, आकाश येवले, राजेंद्र शेळके, दिपक साळवे, विजय मेहेञे, अमोल तनपुरे, अमोल उंडे, गोरक्षनाथ चव्हाण प्रयत्नशील आहेत.


५ ते ९ एप्रिल या पाच दिवस चालणा-या श्री खंडेराया महाराज याञे निमित्त करमणुकीचे साधन म्हणून ओळख असलेले रहाट पाळणे राहुरीत दाखल झाले आहेत. श्री खंडेराया महाराज याञे निमित्त लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने सुरक्षिततेचे उपाय म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, याञा कमेटीचे कार्यकर्ते तैनात राहणार आहेत. याञेतील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गालगत श्री खंडेराया महाराज मंदिराच्या बाहेर तसेेच रहाट पाळण्या जवळ टिव्ही स्क्रीन बसविली जाणार आहे. अशी माहिती रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिली.