पाण्याच्या चारीच्या वादातून शेजार्यांकडून मायलेकास मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील संक्रापुर येथे शेतीतील पाण्याच्या चारीच्या वादातून शेजार्यांकडून मायलेकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ६ जणां विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंदा जालिंदर चव्हाण (वय ५० वर्षे, रा. संक्रापुर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांच्या शेतातून इरिगेशनची पाण्याची चारी जात असून त्यावरून शेजारी दादासाहेब वेणुनाथ चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद सुरू होता. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मंदा चव्हाण व त्यांचे पती शेतात काम करत असताना आरोपी दादासाहेब वेणुनाथ चव्हाण, कमा दादासाहेब चव्हाण, करण दादासाहेब चव्हाण, संजय वेनुनाथ चव्हाण, सुनिता संजय चव्हाण व प्रसाद संजय चव्हाण (सर्व रा. संक्रापुर, ता. राहुरी) हे शेतातील पाण्याची चारी बुजवत होते.
यास विरोध केल्याने वाद वाढला. यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करत हाताने व लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची पोत तोडून नेल्याचा आरोप आहे.
दरम्यान, फिर्यादीचा मुलगा अमोल हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता, त्यालाही प्रसाद चव्हाण याने खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा रजि. नं. ३९५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ११९ (१) , १८९ (२), १९०, १९१ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
