शेळ्या चोरीची विचारणा केल्याने एकाला जबर मारहाण.
आकाश गायकवाड यांना चाॅपर, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यात शेळ्या चोरीची विचारणा केल्याने एकाला जबर मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी ११ जणां विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत आकाश दगडू गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गायकवाड हे राहुरी फॅक्टरी परिसरात असताना त्यांच्या आईने फोनवरून घरातील शेळ्या चोरीस गेल्याची माहिती दिली.
यानंतर ते राहुरी फॅक्टरी नाका येथे गेले असता त्यांना सोनू बाळू गायकवाड हा दिसला. त्याच्याकडे शेळ्या चोरी बाबत विचारणा केली असता त्याला राग आला. त्यानंतर सोनू गायकवाड याने फोन करून इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यामध्ये बाळू गायकवाड, शंकर गायकवाड, बबलू संजय गायकवाड, गणेश रमेश गायकवाड, राहुल गोरख गायकवाड, पिंटू गायकवाड (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) तसेच पाच अनोळखी इसमांचा समावेश होता.
सर्व आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी खाली पडले असता सोनू गायकवाड याने चॅपरने डाव्या कानाजवळ वार करून जखमी केले. तसेच शंकर गायकवाड याने लाकडी काठीने पायावर मारहाण केली, तर बबलू गायकवाड याने डाव्या डोळ्याजवळ प्रहार केला. या घटनेत गायकवाड जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
