श्रीगोंद्यासाठी अभिमानाची बातमी | रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस बिनविरोध....
श्रीगोंदा : महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅनेजिंग कौन्सिल या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेतील समितीवर श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ही निवड श्रीगोंदा तालुक्यासाठी अत्यंत गौरवाची बाब मानली जात असून, भोस यांच्या अनुभवाचा लाभ आता राज्यातील विस्तृत शैक्षणिक कार्याला मिळणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढवणे आणि संस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून उभी राहिलेली असून, ग्रामीण व सर्वसामान्य घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे मोठे कार्य करत आहे. अशा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर निवड होणे हे प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे पद मानले जाते.
मॅनेजिंग कौन्सिल ही संस्थेची धोरणात्मक निर्णय घेणारी प्रमुख समिती असून, शाळा व महाविद्यालयांच्या कामकाजावर देखरेख, नवीन प्रकल्पांना मंजुरी, आर्थिक नियोजन आणि प्रशासनिक निर्णय यामध्ये या समितीची महत्त्वाची भूमिका असते.
बाबासाहेब भोस यांच्या बिनविरोध निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्याचा मान उंचावला असून, स्थानिक पातळीवरून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वातून रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
