Type Here to Get Search Results !

पारनेर - सावरगाव आणि पठारभागाचा आधारवड अमृतशेठ गुगळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 सावरगाव आणि पठारभागाचा आधारवड अमृतशेठ गुगळे यांचे अल्पशा आजाराने निधन



पारनेर (प्रतिनिधी):                   सावरगाव व परिसरातील गुगळे परिवारातील ज्येष्ठ बंधू अमृतशेठ गुगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सावरगाव, पठारभाग आणि आसपासच्या परिसरावर शोककळा पसरली. अमृतशेठ हे गावच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक कार्यात अग्रेसर भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.

गुगळे परिवार हा सावरगावच्या जडणघडणीत अग्रभागी राहणारा परिवार आहे. प्रदीप शेठ गुगळे यांच्या माध्यमातून सरपंच पदाची धुरा या कुटुंबाने यशस्वीरित्या सांभाळली होती. अमृतशेठ यांच्यासह पाच भाऊ – रमेशशेठ, अमृतशेठ, सुभाषशेठ, इंद्रभानशेठ आणि प्रदीप शेठ – यांचा हा एकजुटीचा परिवार आहे. त्यांना पाच बहिणीही आहेत. सर्व भाऊ उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावलेले आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीतील आकाश आणि शेखर यांनीही उद्योगव्यवसायात मोठी भरारी घेतली आहे.

अमृतशेठ गुगळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे गरिबांच्या मदतीचा त्यांचा सातत्यपूर्ण दृष्टिकोन. गावातील एखाद्या गरीब कुटुंबाला आर्थिक अडचण, दिवाळी, इतर सणवार किंवा कोणत्याही संकटात मदत हवी असल्यास गुगळे बंधू कधीही मागे हटले नाहीत. पैसे असोत की नसोत, त्यांनी कधीही गरजू व्यक्तींच्या मदतीला पाठ फिरवली नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हृदयात गुगळे परिवाराची नाळ घट्ट जोडली गेली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक उद्योजक नव्हे तर एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे, असे गावकऱ्यांचे मत आहे.

अमृतशेठ यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील शेकडो लोकांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.