आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल
डॉ. प्रकाश पवार यांना नवी दिल्ली येथे अटल भारत गौरव पुरस्काराने सन्मानीत
कर्तव्य, समर्पण आणि राष्ट्रीय गौरवः डॉ. प्रकाश रावसाहेब पवार वैद्यकीय सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही, तर तो त्याग, समर्पण आणि अविरत सेवाभावावर आधारलेला एक पवित्र यज्ञ आहे. या विधानाचा जिवंत प्रत्यय म्हणजे राहुरी येथील सुप्रसिद्ध डॉ प्रकाश रावसाहेब पवार यांना नुकताच नवी दिल्ली येथे अटल भारत गौरव सन्मान २०२६ या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा आलेख नाही, तर गेली १५ वर्षे त्यांनी सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आणि घेतलेल्या अथक परिश्रमांची पोचपावती आहे. त्यागातून घडलेले डॉक्टरपण सामान्यतः समाज डॉक्टरांचे मूल्यमापन त्यांच्या शुल्कावरून किंवा यशावरून करतो, परंतु त्या पांढऱ्या कोटाच्या मागे दडलेला संघर्ष आणि त्याग अनेकदा दुर्लक्षित राहतो. डॉ. प्रकाश पवार यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हजारो पानांचा अभ्यास, असंख्य जागून काढलेल्या रात्री, सण-उत्सवांच्या काळातही रुग्णांच्या सेवेसाठी दिलेली उपस्थिती, कुटुंबासोबतच्या अनेक मौल्यवान क्षणांचा दिलेला बळी, यातून त्यांचे डॉक्टरपण आकाराला आले आहे. रात्री-अपरात्री येणारे आपत्कालीन फोन कॉल्स स्वीकारून, स्वतःच्या सुखाचा त्याग करत रुग्णांचे प्राण वाचवणे हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे.
स्थितप्रज्ञ वृत्ती आणि संवेदनशीलता वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेकदा मानसिक आणि भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते. सर्वतोपरी प्रयत्न करूनही एखादा रुग्ण जेव्हा बरा होत नाही, तेव्हा निर्माण होणारी निराशा आणि कौटुंबिक तणाव सहन करत, दुसऱ्याच क्षणी नव्या रुग्णास धीर देण्याचे कठीण काम डॉ. पवार अत्यंत धीराने करतात. रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या उद्धट वर्तनावरही शांत राहून, केवळ सेवाभाव मनात ठेवून काम करणे ही त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीची आणि पराकोटीच्या सहनशीलतेची साक्ष देते.
सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय सन्मान डॉ. पवार यांचे कार्य केवळ हॉस्पिटलच्या चार भिंतींपुरते मर्यादित नाही. त्यांनी आरोग्य सेवेसोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच निस्वार्थी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन अवॉर्ड्स ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने ६ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अटल भारत गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून त्यांनी केवळ राहुरीचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.
कृतज्ञतेची भावना एक यशस्वी आणि थोर व्यक्ती नेहमी नम्र असते, याचा परिचय डॉ. पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना करून दिला. हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी स्वतः कडे न ठेवता, आपल्यावर सदैव प्रेम करणाऱ्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना आणि हितचिंतकांना समर्पित केला. यातून त्यांची कृतज्ञता आणि माणसांबद्दलची आपुलकी दिसून येते.
तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून नियमित रक्तदान शिबिर आयोजित करणे महिलांमध्ये कॅन्सर आजाराबद्दलच्या शंका निवारण करण्यासाठी वारंवार समुपदेशन तसेच शिबिर आयोजित करणे, शाळेतील मुलांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिर तसेच गरजूंना मोफत औषध वाटप हे उपक्रम राबविले जातात.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील एकीकडे इंग्रजी माध्यमांचा बोलबाला असताना मातृभाषेतील शिक्षण सोपे जावे म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमाची सेमी इंग्रजीतून नर्सरी ते दहावीपर्यंत ची शाळा सुरू केली या माध्यमातून जवळपास 500 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना डॉ पवार यांच्या सहकार्याने नोकरीच्या माध्यमातून साधारण 60 ते 70 कुटुंबांना आधार देण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.
वैद्यकीय खांद्यावर पांढरा कोट आणि मनात रुग्णसेवेचा ध्यास घेऊन जगणाऱ्या डॉ. प्रकाश रावसाहेब पवार यांच्यासारख्या डॉक्टरांमुळेच समाजाचा व्यवस्थेवरील विश्वास टिकून आहे. त्यांचा हा सन्मान तरुण पिढीतील डॉक्टरांसाठी आणि समाजसेवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांना या सर्वोच्च बहुमानाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या अविरत सेवेला मानाचा मुजरा !
